भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भूषविणारे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, भारतातील आर्थिक क्रांतीचे जनक आणि अजातशत्रू राहिलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात हृदयाच्या आजारपणामुळे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
हृदयाशी संबंधित आजारामुळे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी जीवनरक्षक प्रणालीला प्रतिसाद देणे बंद केले आणि गुरुवारी रात्री ९.५१ वाजता त्यांची प्राणज्योत वयाच्या ९२ व्या वर्षी 'एम्स' रुग्णालयात निधन. काँग्रेस पक्षासह देशभर शोककळा मालवली.
जागतिकीकरणाचे शिल्पकार
डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते, ९० च्या दशकात आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी आर्थिक उदारीकरणाची जोड देत संकटातून बाहेर काढले. त्यांनी अथक प्रयत्नांमुळे जागतिकीकरणाच्या दिशेने भारताला चालना दिली. त्यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, तर ते जागतिक आर्थिक सुधारणांच्या पटलावर भारताचा ठसा उमटवणारे एक आदर्श नेते होते. १९९१ साली भारत आर्थिक संकटात सापडला होता. परकीय गंगाजळी संपल्याने देशावर आर्थिक दिवाळखोरीचे संकट होते. त्याच वेळी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. आपल्या आर्थिक धोरणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले.
Ref: https://epaper.pudhari.news/editionname/Sangli/PUDHARI_SAN/page/3/article/PUDHARI_SAN_20241227_03_3
0 comments:
Post a Comment