जनता दल निधर्मी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचा स्मृतिदिन . प्रा. शरद पाटील यांनी गेल्या ५५ वर्षांमध्ये सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलं होतं. शरद पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलं. तर, पुणे पदवीधर मतदारसंघातून ते एकदा विजयी झाले होते.
प्रा. शरद पाटील हे जनता दलाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत मिरज विधानसभा मतदारसंघातून १९९० आणि १९९५ मध्ये विजयी झाले होते. या दोन टर्ममध्ये त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नांना वाचा फोडली. यानंतर विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पाटील यांनी निवडणूक लढवली. २००२ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते प्रकाश जावडेकर यांना पराभूत केलं होतं. प्रकाश जावडेकर यांना पराभूत करत ते जाएंट किलर ठरले होते.
देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जनता दल निधर्मी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पाटील यांनी काम पाहिलं. ५५ वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्यानं शरद पाटील सामाजिक चळवळींना बळ देण्याचं देखील काम करत होते. प्रा. शरद पाटील हे देशभक्त आर.पी. आण्णा पाटील यांचे सुपुत्र होय. शरद पाटील यांनी वडिलांचा वारसा आपल्या कामातून जपला. सांगली येथील लट्ठे एज्युकेशन सोसायटी मध्ये ४० वर्षे कार्यरत होते. तसेच मिरजेतील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत होते.
"स्वर्गीय प्रा. शरद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
0 comments:
Post a Comment