भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती दिली अशांमध्ये आघाडीवर घेतले जाणारे नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद. 23 जूलै 1906 साली मध्यप्रदेशमध्ये "भाबरा" या गावात जन्मलेल्या चंद्रशेखर यांची आज जयंती असून त्यांचे काम आपल्या तरुण पिढीने समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी घेतलेली उडी, पुढे अतिशय अवघड प्रसंगातही देशासाठी लढण्याची असणारी तयारी, स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान आणि एकूणच त्यांच्या कार्याची ओळख या पाच गोष्टीतून करुन घेऊ या..
1) चंद्रशेखर आझाद याचं बालपण भिल्ल वस्तीत गेल्यानं त्या मुलांसारखं यांना देखील धनुष्यबाण उत्तम रीतीनं चालवता येत असे. लहानपणा पासून विद्रोही स्वभावाच्या चंद्रशेखर आझाद याचं मन बिलकुल अभ्यासात रमलं नाही. या उलट खेळणं मात्र त्यांना फार आवडत होते. चंद्रशेखर आणि त्यांचा भाऊ सुखदेव याला शिकविण्याकरता त्यांच्या वडिलांचे मित्र मनोहरलाल त्रिवेदी घरी येत असत.चंद्रशेखर यांच्या आईला त्यांना संस्कृतचा विद्वान बनविण्याची इच्छा होती , त्यामुळे चंद्रशेखर यांना संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथील काशी विद्यापीठात पाठविण्यात आलं.
2) पुढे 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेचा चंद्रशेखर यांच्यावर चांगलाच परिणाम झाला. त्यानंतर चंद्रशेखर आझाद हे 1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीचा एक भाग बनले आणि वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना अटकही झाली. ब्रिटीश न्यायालयाने या छोट्या मुलाला 12 फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि त्यांचा अहिंसेवरील विश्वास पार उडाला. त्यामुळे ते मनाने आपोआप क्रांतिकारक बनले. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
3 ) चंद्रशेखर आझाद हे एक महान क्रांतिकारी होते. आपल्यातील देशभक्तीची भावना आणि अद्वितीय साहसाने त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि अनेक लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याकरता प्रेरित केले. मातृभूमीच्या या महान सुपुत्राने आपल्यातील शौर्याच्या बळावर काकोरी ट्रेन लुटली आणि वाइसरायच्या ट्रेनला उडवण्याचा देखील प्रयत्न केला.
4) पुढे 1922 साली महात्मा गांधीजींनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढून टाकले. त्याचे आझाद यांना फार वाईट वाटले. त्यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. पुढे त्यांची भेट हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन चे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली.
चंद्रशेखर आझाद म्हणायचे…
“संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही”
पुढे इंग्रजांच्या असेम्ब्लीत बॉम्ब फोडण्याच्या घटनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांना पुरेपूर मदत केली. भगत सिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी देखील आझाद यांनी भरपूर प्रयत्न केलेत परंतु इंग्रजांच्या सैन्य बलापुढे त्यांचा नाईलाज झाला. परंतु नेहमीप्रमाणे इंग्रजांना चकमा देण्यात ते यशस्वी ठरले.
5) इतकेच नव्हे तर महान क्रांतिकारी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सोंन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या, शिवाय भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू यांच्यासमवेत हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सभेची स्थापना केली. चंद्रशेखर आझाद हे भगतसिंग चे सल्लागार होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
Source: https://www.esakal.com/desh/chandrashekhar-azad-birth-anniversary-5-things-about-him-that-inspires-youth-dds97
0 comments:
Post a Comment