ग्रंथवर्गीकरण पद्धतीत स्वतंत्र, विशिष्ट तत्त्वांनी युक्त आणि सखोल वर्गीकरणास योग्य अशी वर्गीकरण पद्धती निर्माण करून जगात भारताचे नाव प्रसिद्धीस आणणाऱ्या (अजरामर करणाऱ्या) आणि भारतीय ग्रंथालयीन चळवळीचे जनक समजल्या जाणाऱ्या व्यक्तीचे नाव म्हणजेच पद्मश्री डॉ. एस्. आर. रंगनाथन होय.
कौटुंबिक माहिती -
डॉ. रंगनाथन यांचे संपूर्ण नाव शियाली रामामृत रंगनाथन अय्यर होय. त्यांचा जन्म मद्रास (त्या वेळचे तामिळनाडू) प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली येथे ९ ऑगस्ट १८९२ रोजी झाला. मात्र कार्यालयीन कामकाजात त्यांची जन्मतारीख १२ ऑगस्ट दर्शविली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव एन. रामामृतम अय्यर तर आईचे नाव सीतालक्ष्मी होय.
शिक्षण -
डॉ. रंगनाथन यांनी शालेय शिक्षण शियाली येथेच पूर्ण करून १९०९ साली ते मॅट्रिक पास झाले. १९०९ ते १९१३ या कालावधीत मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन त्यांनी बी. ए. पदवी मिळविली व १९१६ ला एम. ए. ही पदवी गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले. १९१६-१७ साली व्यावसायिक शिक्षण घेऊन एल्. टी. ही शिक्षणशास्त्राची पदवी मिळवली व पुढे १९२४ साली ग्रंथालयशास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.
ग्रंथालयशास्त्रातील योगदान -
इंग्लंडवरून परततानाच्या बोटीच्या प्रवासात द्विबिंदू वर्गीकरण पटु आराखडा तयार केला. व जून-जुलै १९२५ मध्ये मद्रास विद्यापीठात वर्गीकरणाचा त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला. जानेवारी 1928. साली मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. १९२९ साली मद्रास ग्रंथाल संघाच्या वतीने ग्रंथालय प्रशिक्षण वर्ग सुरू केला. १९३१ ला मद्रास विद्यापीठात पहिले लायब्ररी स्कूल सुरू केले. १९३३ ला भारतीय ग्रंथालय संघाची स्थान केली. १९४७ साली दिल्ली विद्यापीठात ग्रंथालय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मुहूर्तमेढ रोवली. पुढे ग्रंथालयशास्त्रात पीएच. डी. ची सुविधाही उपलब्ध केले
विविध प्रकाशने -
ग्रंथालयशास्त्रावर त्यांचे विविध ग्रंथ प्रकाशित आहेत ते पुढीलप्रमाणे
i) कोलन क्लासिफिकेशन, प्रथम आवृत्ती १९३३
ii) क्लासिफाईड कॅटलॉग कोड, प्र. आ. १९३४
iii) लायब्ररी ॲडमिनिस्ट्रेशन, १९३८
iv) Five Laws of Library Science, १९३१
v) प्रोलोगोमेना टु लायब्ररी क्लासिफिकेशन, १९३७
डॉ. रंगनाथन यांनी ५३ ग्रंथ व १५०० च्या आसपास लेख लिहिते आहेत.
१९४८ पासून आशिया, युरोप, अमेरिका खंडांतील निरनिराळ्या पाश्चात्य देशातून त्यांना मुद्दाम निमंत्रण देऊन व्याख्यानासाठी व विचारविनिमय करण्यासाठी बोलविण्यात आले.
सन्मान -
१९३५ साली भारतसरकारकडून रावसाहेब किताब जाहीर, ग्रंथालय क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्ली विद्यापीठातून डी. लिट्. पदवी प्रदान. १९५७ साली भारतसरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर. १९७० साली वर्गीकरण व तालिकीकरणमधील उल्लेखनीय कार्याबद्दल अमेरिकन ग्रंथालय संघाकडून मॉर्गारेट मॅन पुरस्कार मिळाला.
अनुभव आणि पदे
सुरुवातीला गणिताचे सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून कामाला सुरुवात केलेल्या रंगनाथन यांनी विविध पदे भूषविली आहेत. १९२४-४४ मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल, १९२८-४८ सचिव-मद्रास ग्रंथालय संघ, १९४४- १९५३ अध्यक्ष- भारतीय ग्रंथालय संघ, १९४८-५३ सभासद प्रौढ शिक्षण परिषद-दिल्ली महानगरपालिका, १९४८-५७ उपाध्यक्ष मद्रास ग्रंथालय संघ, १९४९-५३ संपादक-अब्जीला १९५१-६१ Reporter General FID/ CA, १९५८-६१ उपाध्यक्ष FID तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष.
विद्यापीठ लायब्ररी डेव्हलपमेंट प्लॅन -
डॉ. रंगनाथन यांनी दिल्ली, अलाहाबाद, नागपूर, कोचीन, उत्तर प्रदेश, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्युट - डेहराडून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर इत्यादी संस्थांच्या ग्रंथालयाच्या विकासासाठी स्वतंत्र प्लॅन तयार केले.
अशा प्रकारे ग्रंथालयशास्त्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान श्री. एस्. आर. रंगनाथन यांनी दिलेले आहे. त्यांचा मृत्यू वयाच्या ८० व्या वर्षी बेंगलोर येथे २७ सप्टेंबर १९७२ रोजी झाला.
0 comments:
Post a Comment